
जळगाव, 14 एप्रिल, (हिं.स.) - उन्हाचा तडाखा आता जीवघेणा ठरू लागला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून गेल्या २४ तासात तापमानाचा पारा तब्बल ४२.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जळगावकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत.
विशेष म्हणजे, यंदा प्रथमच तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, किमान तापमानही २४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.गेल्या आठवड्याभराचा विचार करता अवघ्या सहा दिवसांत तापमानात सुमारे ७ अंशांनी वाढ झाली आहे. पश्चिमेकडून वाहणारे कोरडे व उष्ण वारे आणि वातावरणातील आर्द्रतेचे घटलेले प्रमाण यामुळे जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’चा प्रभाव जाणवत असल्याचे हवामान अभ्यासकांनी नमूद केले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पुढील दोन दिवसांत तापमान ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान स्थिर राहू शकते. यामुळे एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखे चटके जाणवू लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर