
अमरावती, 14 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीच्या राजकारणात सध्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका शायरीमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “है ना, आपको हम जैसे हजारों मिलेंगे, पर उन हजारों में हम नहीं मिलेंगे” या शेरमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
ही केवळ काव्यात्मक अभिव्यक्ती नसून एक स्पष्ट आणि धारदार राजकीय संदेश असल्याची चर्चा रंगली आहे. या पोस्टनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात विविध अर्थ लावले जात असून हा इशारा नेमका कोणाकडे आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांत नवनीत राणांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाचे बदल आणि घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकणे तसेच विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळले जाणे, या घटनांमुळे त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शेअर करण्यात आलेल्या शायरीमुळे हा संदेश दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडे आहे की राज्यातील प्रभावशाली नेत्यांकडे, याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. “समझदार को इशारा काफी है” अशा सूचक विधानामुळे या पोस्टचा अर्थ अधिक गूढ बनला आहे.
दरम्यान, अमरावतीच्या राजकीय वर्तुळात या ‘शेर’चा नेमका ‘शिकार’ कोण, यावरच सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी