
पुणे, 14 एप्रिल (हिं.स.)। पुण्याहून सोलापूरला आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांतच पोहोचणे शक्य होणार आहे. पुणे विमानतळावर सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्लॉट मंजूर झाले असून १ मेपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. पुण्याहून पहिल्यांदाच सोलापूरशी हवाई कनेक्टिव्हिटी होत असून या निमित्ताने पुण्याशी जोडलेले सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे.
पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम सुरू झाला असून १ मेपासून पुणे विमानतळाला मंजूर झालेले १५ स्लॉटचा वापर सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ होत आहे. १५ अतिरिक्त स्लॉटमुळे आता दररोजच्या एकूण स्लॉटची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. नवीन स्लॉटमध्ये पुण्याहून सोलापूर, मंगळूरू व बागडोगरा या शहरांसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा सुरू होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु