
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.) सध्याच्या काळात विकासाची संकल्पना फक्त सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्त्यांपुरती मर्यादित होत चालली असून, या वरवरच्या विकासाचा समाजातील मोठ्या घटकाला काहीच लाभ होत नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. सामाजिक आणि आर्थिक भान असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण दृष्टीकोनाची आज देशाला अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत रत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय असून, देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्यांच्या ऋणात राहतील, असे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींमुळे रुपया कमकुवत होत असताना, ‘The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution’ सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे बाबासाहेब आठवतात, असे ठाकरे म्हणाले. ब्रिटिश धोरणांमुळे रुपयाचे अवमूल्यन कसे झाले आणि त्याचा सामान्य जनतेवर कसा परिणाम झाला, याचे सखोल विश्लेषण त्यांनी या ग्रंथात केले आहे. त्यांच्या विचारांवरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला, असेही त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची दृष्टी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नव्हती, तर समाजाच्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत विकास पोहोचावा, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. सामाजिक न्यायासोबत आर्थिक विकासाची जाण असलेले बाबासाहेब त्या काळातील अग्रगण्य नेते होते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या महान नेत्यांच्या नावाने समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तीवरही टीका केली. केवळ पुतळे उभारणे, मिरवणुका काढणे किंवा जातीय राजकारण करणे याऐवजी त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.
शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन करत त्यांनी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन केले.-------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule