आंबेडकरांच्या आर्थिक-सामाजिक लोकशाहीशिवाय समताधिष्ठित भारत अशक्य - लक्ष्मीकांत देशमुख
पुणे, 14 एप्रिल (हिं.स.)आजच्या बदलत्या सामाजिक व आर्थिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आर्थिक व सामाजिक लोकशाहीची संकल्पना अधिकच सुसंगत ठरत असून, तिची प्रभावी अंमलबजावणी झाल्याशिवाय समताधिष्ठित भारताची उभारणी शक्य ना
egfed


पुणे, 14 एप्रिल (हिं.स.)आजच्या बदलत्या सामाजिक व आर्थिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आर्थिक व सामाजिक लोकशाहीची संकल्पना अधिकच सुसंगत ठरत असून, तिची प्रभावी अंमलबजावणी झाल्याशिवाय समताधिष्ठित भारताची उभारणी शक्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “डॉ. आंबेडकरांची आर्थिक व सामाजिक लोकशाहीची संकल्पना आणि आजचे वास्तव” या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. देशमुख यांनी सांगितले की, भारतात राजकीय लोकशाही स्थापन झाली असली तरी आर्थिक व सामाजिक लोकशाहीची अंमलबजावणी अद्यापही अपुरी आहे. शिक्षण, रोजगार, संसाधनांचे न्याय्य वितरण आणि सामाजिक सन्मान या क्षेत्रांमध्ये अजूनही विषमता दिसून येते. ‘समता, स्वातंत्र्य आणि बंधुता’ ही डॉ. आंबेडकरांनी मांडलेली त्रिसूत्री केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष व्यवहारात उतरली पाहिजे, तेव्हाच लोकशाही अधिक सक्षम आणि परिणामकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जागतिकीकरण आणि डिजिटल युगामुळे नव्या प्रकारच्या सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांचे विचार समाजाला दिशा देणारे ठरतात. सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आणि वंचित घटकांचे सशक्तीकरण ही राज्यकारभाराची केंद्रस्थाने असली पाहिजेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

यापूर्वी, विद्यापीठ परिसरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास व पूर्णाकृती पुतळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाता, विद्यापीठ अधिकार मंडळाचे संचालक, विद्यापीठाच्या विविध अध्यासनाचे अध्यासनप्रमुख व शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख आदी विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. त्यानंतर सर्व मान्यवर व विद्यार्थी व्याख्यानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande