
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)। शासनाच्या सौर कृषी पंप योजनेने बीड जिल्ह्यात शेतीचा चेहरामोहरा बदलला असून आतापर्यंत ४९ हजार ६४७ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर पंप यशस्वीपणे बसवले आहेत. महावितरणने कामात गती आणण्यासाठी कंत्राटदार कंपन्यांची संख्या ६० पर्यंत वाढवली असून दिरंगाई करणाऱ्या कंपन्यांना आता प्रतिदिन दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने सिंचन व्यवस्था सुलभ झाली असून उत्पादकतेत मोठी वाढ होत आहे.
सध्या जिल्ह्यात आणखी १,३०० ठिकाणी कामे युद्धपातळीवर सुरू असून मक्तेदारी संपवण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कंपनी निवडलेली नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यापासून दोन महिन्यांत काम पूर्ण करणे कंपन्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis