
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या नांदेड जिल्हा पाहणी दौऱ्यात जिथे अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळून येईल, तेथे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
अंदाज समितीच्या दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, समितीने आपला अहवाल नियमानुसार विधीमंडळाला सादर करून अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी. कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला किंवा गैरव्यवहाराला पाठीशी घालता कामा नये, ही आपली ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अंदाज समितीला आढळलेल्या गैरव्यवहारांची माहिती सार्वजनिक करणे शक्य असेल तर त्या आधारे पुढील चौकशीसाठी पाठपुरावा केला जाईल. प्रत्येक गैरव्यवहाराची सत्यता समोर आली पाहिजे आणि भ्रष्टाचाराचा पूर्णपणे नायनाट झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या दौऱ्यात समोर आलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis