
लातूर, 14 एप्रिल, (हिं.स.)। हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असून आगामी काही दिवसात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ अंश सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सन बर्न, हिट क्रॅम्प्स (उष्णतेमुळे स्नायुंना गोळे येणे), हिट एग्जोर्शन (उष्णतेमुळे प्रचंड थकवा), हिट स्ट्रोक (उष्माघात) यांसारखे प्रामुख्याने उष्णताविकार असून साधारण एप्रिल, मे या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो.
हवामान खात्याने दिलेल्या या इशाराच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात आलेली असून ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर शासकीय दवाखान्यात उन्हाळाच्या पूर्वतयारी अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत १ मार्च पासूनचं उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर कक्षात उष्णताविकार संबधी रुग्णांसाठी २ खाटा राखीव, मुबलक औषधी साठा, पंखा/कुलर ची सोय, पिण्याचे थंड पाणी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहे. तसेंच, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व आरोग्य संस्था स्तरावर प्रसिद्धी साहित्याद्वारे जनजागृती करण्यात येत असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृह भेटी दरम्यान आरोग्य शिक्षण दिले जात आहे. तसेंच, वर्तमान पत्रे, सोशल मीडियाद्वारे देखील जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
उन्हाळ्यातील विविध उष्णताविकार विशेषतः उष्माघात प्रतिबंध व उपचार अनुषंगाने ग्रामीण भागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट जाणवू शकते, अशा परिस्थितीत विविध उष्णताविकार अथवा उष्माघात होऊ नये यासांठी नागरिकांनी आता पासूनच सजग रहावे व प्रतिबंधात्मक उपायावर अधिक भर द्यावा. तसेच उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis