
जळगाव, 14 एप्रिल (हिं.स.)लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत जळगावमधील शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असं लाचखोर पोलिसाचे नाव असून या कारवाईने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे जळगावचे रहिवासी असून त्यांच्या मुलाविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.एसीबीने शनीपेठ परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून तडजोडअंती १ लाख रुपये स्वीकारताना विनोद अहिरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर