वेद हे अपौरुषेय ज्ञानाचे सर्वोच्च प्रमाण – चंद्रशेखर देगलूरकर
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : वेद हे केवळ ग्रंथ नसून परमेश्वराच्या श्वासातून प्रकट झालेले अपौरुषेय ज्ञान आहे. मानवी बुद्धीच्या पलीकडील, निरपेक्ष आणि अंतिम सत्य मांडणारे वेदच धर्म आणि ब्रह्माचे खरे प्रमाण आहेत, असे प्रतिपादन गाथामूर्ती सद्गुरु चंद्रश
वेद हे अपौरुषेय ज्ञानाचे सर्वोच्च प्रमाण – चंद्रशेखर देगलूरकर


नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : वेद हे केवळ ग्रंथ नसून परमेश्वराच्या श्वासातून प्रकट झालेले अपौरुषेय ज्ञान आहे. मानवी बुद्धीच्या पलीकडील, निरपेक्ष आणि अंतिम सत्य मांडणारे वेदच धर्म आणि ब्रह्माचे खरे प्रमाण आहेत, असे प्रतिपादन गाथामूर्ती सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी केले.

नांदेड येथील श्री याज्ञवल्क्य वेदपाठशाळेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त वामननगरमधील रेणुकादेवी मंदिर प्रांगणात पंचकुंडात्मक श्रीविष्णूपंचायतन महायज्ञ व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.

वेदांचे महत्त्व स्पष्ट करताना महाराजांनी सांगितले की, जे प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही तेच वेदांचे वेदत्व आहे. वेद हे निरपेक्ष वाक्य असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेपाचा अंश नाही, म्हणूनच ते अपौरुषेय आहेत. श्रुती-स्मृतींचे तत्त्व आचरणात आणणाऱ्यांनाच समाजात मार्गदर्शक स्थान मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मनोजगुरु जोशी पेठवडजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शंकर पांडे यांनी वेदपाठशाळेच्या स्थापनेचा इतिहास मांडला.

यावेळी गुरुवर्य गोपाळशास्त्री गोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘शास्त्री पुरस्कार’ ह.भ.प. गहिनिनाथ महाराज औसेकर (पंढरपूर) यांना प्रदान करण्यात आला. तसेच काशीच्या स्मरणार्थ ‘वैदिक पुरस्कार’ वाराणसी येथील वे.शा. सं. घनपाठी श्रीनिवास पुराणिक यांना देगलूरकर महाराजांच्या हस्ते देण्यात आला. रुपेश किनेकर जोशी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी वेदपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. वेदसंवर्धनासाठी समर्पण आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात वेदमूर्ती अंबरीश जोशी फरकंडेकर यांचा निरोप समारंभ पार पडला. भक्तिगीत सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक कासराळीकर यांनी केले, तर संजय जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande