
नांदेड, 14 एप्रिल (हिं.स.) : “संपलाही नाही, संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा” या प्रेरणादायी ओळींनी सजलेले “भीमाचा दरारा” हे भीमगीत नांदेड येथे मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हे गीत सादर करण्यात आले.
डॉ. शिवराज शिंदे यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते औपचारिकरित्या प्रकाशित करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत भीमगीतांच्या माध्यमातून समाजात समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश पोहोचवण्याचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, ललित प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम उपस्थित होते.
“भीमाचा दरारा” हे गीत केवळ सांगीतिक प्रस्तुती नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या गीताच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आंबेडकरी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
डॉ. शिवराज शिंदे हे विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलात संगीत विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या विविध संगीत रचनांना प्रेक्षकांची दाद मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis