
छत्रपती संभाजीनगर, 14 एप्रिल (हिं.स.) : भारतीय संविधानाने नागरिकांना हक्कांबरोबरच कर्तव्येही दिली असून, सुजाण नागरिक म्हणून संविधानाच्या उद्देशिकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत मूल्यांचा अंगीकार करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपनिवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, रोहयो उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देताना सांगितले की, संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार दिला असून एकात्मता व बंधुभाव या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करण्याचे मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या जडणघडणीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis