
पिंपरी, 14 एप्रिल (हिं.स.)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही आधुनिक भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देणारे ठरत असून,जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी शोधताना त्यांच्या दूरदृष्टीची प्रासंगिकता अधिक ठळकपणे जाणवते. सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक समतेचा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय युवकांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे,असे मत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात परदेशातून नंदू मोरे (बेल्जियम),डॉ. शैलेश कोळेकर (डेन्मार्क),रेवा रॉय (कॅनडा),विरेंद्र घुटके (स्वीडन),धम्मचारी सुदिप्ता (इंग्लंड) यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभाग घेतला तर प्रा. डॉ. संजय खोब्रागडे (नागपूर),प्रा. केशव वाघमारे (संशोधक),प्रा. डॉ. अशोक गायकवाड (प्राचार्य,कला,वाणिज्य,बी.बी.ए. महाविद्यालय,वडगाव मावळ),प्रा. डॉ. नितीश नवसागरे (विधी महाविद्यालय,पुणे),प्रा. रोनके राम (पंजाब विद्यापीठ),प्रा. विवेक कुमार (जेएनयू,दिल्ली) हे देखील उपस्थित होते.यावेळी महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करताना नंदू मोरे यांनी जागतिक स्तरावर बदलत असलेल्या कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. प्रोग्राम मॅनेजमेंट,कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय),ऍनिमेशन,डेटा सायन्स आणि डेटा ऑटोमेशन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच उत्तम संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) हे जागतिक पातळीवर यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडामधील रोजगाराच्या संधींबाबत माहिती देताना रेवा रॉय यांनी नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. वेगाने बदलणाऱ्या जागतिक रोजगार बाजारात टिकून राहण्यासाठी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रावीण्य यांच्या आधारे भारतीय युवकांसाठी परदेशात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांचे कथन करताना धम्मचारी सुदिप्ता यांनी परदेशातील शैक्षणिक प्रवासातील आव्हाने मांडली. वंचित समाजाच्या प्रश्नांना जागतिक स्तरावर मांडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परदेशातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते,असे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु