विक्रम सोलरने जागतिक स्तरावर १० गिगावॅटचा टप्पा गाठला
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतातील आघाडीची सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनी विक्रम सोलरने जागतिक स्तरावर १० गिगावॅट सौर मॉड्यूल क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या गाठला असून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील आपली भक्कम उपस्थिती आणखी मजबूत केली आहे.
Vikram Solar Achieves 10 GW Milestone Globally


मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतातील आघाडीची सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक कंपनी विक्रम सोलरने जागतिक स्तरावर १० गिगावॅट सौर मॉड्यूल क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या गाठला असून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील आपली भक्कम उपस्थिती आणखी मजबूत केली आहे. कंपनीच्या या उल्लेखनीय यशामुळे भारतातील सुमारे ५० लाखांहून अधिक घरांना वीज पुरवठा शक्य होत असून देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात तिची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

विक्रम सोलरने अवघ्या दोन वर्षांत आपली क्षमता ५ गिगावॅटवरून दुप्पट वाढवत १० गिगावॅटपर्यंत नेली आहे. या वाढीमुळे कंपनीची तांत्रिक क्षमता, उत्पादनातील सातत्य आणि सौर ऊर्जेच्या वाढत्या मागणीला दिलेला प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येतो. कंपनीने जगभरात बसवलेली सौर मॉड्यूल्सची संख्या २५ दशलक्षांहून अधिक असून हा आकडा तिच्या व्यापक विस्ताराचे प्रतीक आहे. भारतातील सौर ऊर्जा क्षेत्राने अलीकडच्या काळात विक्रमी प्रगती करत १५० गिगावॅट क्षमतेचा टप्पा पार केला आहे. या परिवर्तनात विक्रम सोलरने महत्त्वाची भूमिका बजावत उच्च-कार्यक्षम सोलर उपाय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीचे बहुतांश प्रकल्प भारतात असले तरी जागतिक बाजारपेठेतही तिने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. जवळपास १.५ गिगावॅट क्षमतेची निर्यात करत विक्रम सोलरने ३९ देशांमध्ये आपले जाळे विस्तारले आहे.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि दर्जेदार उत्पादनामुळे कंपनीने जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. कोचीनमधील पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ उभारण्यात सहभाग, तसेच भारतातील सुरुवातीच्या फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमध्ये योगदान यामुळे कंपनीने तंत्रज्ञान स्वीकारण्यात अग्रक्रम राखला आहे. ब्लूमबर्ग एनईएफच्या टियर १ यादीत स्थान, किवा पीव्हीईएल मॉड्यूल रिलायबिलिटी स्कोअरकार्डमधील मान्यता आणि इकोव्हॅडिसचे प्लॅटिनम रेटिंग यामुळे कंपनीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता अधोरेखित होते.

उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने पाहता, विक्रम सोलरने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे एकत्रित ९.५ गिगावॅट क्षमतेची उत्पादन केंद्रे उभारली आहेत. तामिळनाडूमधील वल्लम येथील ५ गिगावॅट प्रकल्प प्रगत ऑटोमेशन आणि अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. याशिवाय गंगाकोंडन येथील प्रकल्पाचा विस्तार करत कंपनी ६ गिगावॅट मॉड्यूल आणि १२ गिगावॅट सेल उत्पादन क्षमतेकडे वाटचाल करत आहे.

ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही कंपनीने पावले टाकली असून व्हीएसएल पॉवरहाईव्हच्या माध्यमातून बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ५ गिगावॅट-तास क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच निवासी आणि मोबिलिटी बॅकअपसाठी वीयॉन या लिथियम बॅटरी ब्रँडद्वारे उपाय उपलब्ध करून दिले जात आहेत.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश चौधरी यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, १० गिगावॅटचा टप्पा गाठणे हा केवळ अभिमानाचा क्षण नसून सौर ऊर्जा क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या बदलांचे प्रतीक आहे. पुढील काळात उच्च-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा विकास, उत्पादन क्षमता वाढवणे आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन मजबूत करणे यावर कंपनीचा भर राहणार असून जागतिक ऊर्जा संक्रमणात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande