
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.) : मुंबईत एक मोठे आणि धक्कादायक ड्रग्स रॅकेट उघडकीस आले असून केवळ १३ हजार रुपये भाड्याच्या छोट्या खोलीतून तब्बल ३० कोटी रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स व्यवसाय चालवला जात असल्याचे समोर आले आहे. अंधेरी (पूर्व) येथील सहार रोड परिसरातील भास्कर चाळीत ही बेकायदेशीर ड्रग्स फॅक्टरी सुरू होती.
पोलिसांनी या प्रकरणात कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख याला अटक केली आहे. तो याआधी गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता आणि गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत लपून राहत होता.
तपासात उघड झाले की आरोपीने अत्यंत साध्या स्वरूपातील खोलीत रसायने आणि उपकरणे बसवून एमडी ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरीच उभारली होती. तयार होणारे ड्रग्स स्थानिक बाजारात न विकता बाहेर राज्यांमध्ये पुरवले जात होते. पोलिसांच्या अंदाजानुसार दरमहा सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा ड्रग्स व्यवहार होत होता.
या रॅकेटचा पर्दाफाश खार पोलिसांच्या गस्ती दरम्यान झाला. संशयावरून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून १५.४४ ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत संपूर्ण नेटवर्कचा खुलासा झाला.
यानंतर पोलिसांनी अंधेरीतील खोलीवर छापा टाकून ड्रग्स बनवण्यासाठी लागणारी रसायने, उपकरणे आणि साहित्य जप्त केले. या प्रकरणात आरोपीचा साथीदार रिजवान अहमद लियाकत अली यालाही उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे.
तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपीची पत्नी नसरीन ही या व्यवहारातील पैशांचा हिशोब ठेवत होती. तिच्या बँक खात्यातील सुमारे २६ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.
मोहम्मद आरिफ शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमधील एका ड्रग्स प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा झाली होती, मात्र २०२३ मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता.
या प्रकरणामुळे मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलिस या संपूर्ण ड्रग्स नेटवर्कचा पुढील तपास करत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule