महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना वंदन; डॉ. गोऱ्हे यांचे अभिवादन
मुंबई, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
मुंबई


मुंबई, 14 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांना अधिक बळ देण्याची गरज अधोरेखित करत “नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड” या तत्वावर आधारित सर्वसमावेशक विकासाचा संकल्प व्यक्त केला. राज्यघटनेच्या चौकटीत राहून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करत सुशासन देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, सभापतींचे खासगी सचिव पंडित खेडकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिलांनी एकत्र येत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यामध्ये उपनेत्या कला ताई शिंदे, कीर्ती मेश्राम (मुंबई उपनगर), सुनीताताई मोरे (सांगली), संगीता चव्हाण (बीड), रिंकू मोरे (पुणे), शालिनी सुर्वे, कमल कन्नल, वर्षा मोरे (ठाणे), भक्ती भोसले (मुंबई), रेखा मोरे आदींचा सहभाग होता.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा आणि विधानपरिषद या संस्था सातत्याने राज्यघटनेच्या चौकटीत कार्यरत असून सर्व कायदे, अधिकार आणि निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून संरक्षित झालेले आहेत. जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब या प्रक्रियेत उमटून सुशासन घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. मागील वर्षभरात राज्यघटनेच्या संदर्भात दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मी स्वतः आणि सर्व पक्षांच्या सदस्यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण ठरले. विधिमंडळातील नियमांमध्ये बदल करतानाही राज्यघटनेचा आधार घेऊन काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या अधिकारांचे सशक्तीकरण केले. मिताक्षरा आणि दायभागा या कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. या विधेयकाला विरोध झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन समानतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. बाबासाहेबांच्या मानवाधिकार चळवळीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील विषमतेविरुद्ध लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. आजही समाजात जातीयता, धर्मांधता, सक्तीचे धर्मांतर, बालविवाह, वर्णभेद आणि स्त्री-पुरुष असमानता यांसारख्या समस्या कायम असल्याने समानतेकडे वाटचाल अधिक ठोसपणे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande