मविआ सरकारने कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यासाठी इंदू मिल स्मारकाचे काम रखडवले - नवनाथ बन
मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केल्याने या स्मारकाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. मह
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन


मुंबई, 14 एप्रिल (हिं.स.)। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष केवळ कंत्राटदारांकडून पैसे घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम थांबवण्याचे पाप केल्याने या स्मारकाबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प ठेवल्यानेच स्मारकाच्या कामाला उशीर होत आहे. एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडे असल्याचे भान ठेवा, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली आणि डिसेंबर 2026 पर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा भाजपा - महायुती सरकारचा मानस असल्याचेही बन यांनी स्पष्ट केले.

बन यांनी सांगितले की, भोंदूबाबा खरातनंतर संजूबाबा राऊत नवा धंदा सुरू करून रोज खोटे बोलत आहेत. त्यांना इतकेच सांगायचे आहे की अंजली दमानियांना कुठून माहिती मिळते याची चौकशी सुरू आहे आणि कुणाला फोनकॉल केला म्हणून तो लगेच दोषी होत नाही. संजय राऊत, तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने आहात? भोंदूबाबा अशोक खरातच्या की पीडित महिलांच्या बाजूने ते आधी स्पष्ट करा. ज्या पद्धतीने संजय राऊत भोंदूबाबाचे समर्थन करत आहेत त्यात निश्चितच काहीतरी काळेबेरे आहे.

भोंदूबाबा खरातसोबत बोलणाऱ्याचे नाव समोर आले तर तुम्हाला त्याबद्दल चिंता कशाला? भोंदूबाबा खरातला मदत करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणि स्वतः संजय राऊत तुम्हीही केले. तुमच्याच सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी दिले होते. तुम्ही नाशिकचे संपर्कप्रमुख होतात. मग भोंदूबाबा खरातबद्दल माहिती समोर येत असल्यास तुमच्या पोटात का दुखू लागले? उद्या कदाचित संजय राऊत यांच्याही फोनकॉलची माहिती समोर येईल. त्यामुळे ते आजपासून वातावरणनिर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करताहेत, असे बन म्हणाले.

मुंबईतली खेळाची मैदाने ही विद्यार्थी, खेळाडूंसाठीच असतील, हेच या सरकारचे धोरण आहे. तिथे कुठल्याही बिल्डरांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. आणि बिल्डरांच्या गप्पा तुम्ही मारताय? कोविडकाळात कशा पद्धतीने बिल्डरांवर उधळपट्टी करण्याचे काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कुठल्याही मैदानावर पंचतारांकित हॉटेल उभे केले जात नाही. संजय राऊत थोडीशी माहिती घ्या आणि मग बोला. विनाकारण अफवा पसरवण्याचे काम करू नका. कुठल्याही बिल्डरच्या घशात अशा पद्धतीने मैदान देता येत नाहीत हे थोडे तपासून घ्या. महाविकास आघाडी सरकार असताना बिल्डरांना रेड कार्पेट टाकायचे आणि बिल्डरांना मोठेमोठे मोक्याचे भूखंड देण्याचे काम तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने केले होते. संजय राऊत, तुमची किती बिल्डरांसोबत भागीदारी आहे हे महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असेही बन यांनी सुनावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande