
रत्नागिरी, 14 एप्रिल, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. त्यांनी वाळूपासून डॉ. आंबेडकर यांचे सुंदर पोर्ट्रेट साकारले.
ही आगळीवेगळी चित्रकृती तयार करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील पांढऱ्या समुद्र किनाऱ्यावरील पांढरी वाळू तसेच भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी काळी वाळू वापरली. विशेष म्हणजे, केवळ दोन तासांत त्यांनी हे आकर्षक चित्र पूर्ण केले.
विलास रहाटे यांची ही कलाकृती पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कौशल्याची छाप उमटवली असून, गतवर्षी पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील सर्वांत लहान रांगोळी साकारून त्यांनी सर्वांचे कौतुक मिळवले होते.
त्यांच्या या सर्जनशील उपक्रमामुळे परिसरात त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी