
सोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर महापालिकेचे महापौर विनायक कोंडयाल, सोलापूर शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती संस्कृती सातपुते व समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तद्नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत खून प्रकरणातील वारस श्री. आनंद भारत लोंढे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शासकीय नोकरीबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक समतेच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड