“तंत्रज्ञान करुणा, सचोटीची जागा कधीच घेऊ शकत नाही” — राष्ट्रपती
नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचा संवेदनशील मार्ग आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी करुणा, सचोटी आणि संवेदनशीलतेची जागा कधीच घेऊ शकत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी द्रौपदी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नागपूर एम्सच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना


नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : वैद्यकीय क्षेत्र हे केवळ एक व्यवसाय नसून मानवतेची सेवा करण्याचा संवेदनशील मार्ग आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी करुणा, सचोटी आणि संवेदनशीलतेची जागा कधीच घेऊ शकत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू यांनी केले. नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) दुसऱ्या दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

या प्रसंगी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, डॉक्टरांकडून दिला जाणारा सहानुभूतीपूर्ण सल्ला रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक बळ देतो. अनेकदा डॉक्टरांना कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो, मात्र अशा वेळीही त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही वैद्यकीय व्यावसायिकांप्रती आदरभाव ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी हे नाते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.राष्ट्रपतींनी नागरिकांच्या उत्तम आरोग्याचे राष्ट्राच्या प्रगतीशी असलेले नातेही स्पष्ट केले. निरोगी नागरिकच राष्ट्र उभारणीत प्रभावी योगदान देऊ शकतात, असे सांगत केंद्र सरकारने गेल्या दशकात आरोग्य क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे त्यांनी नमूद केले.

देशभरात नवीन एम्स संस्थांच्या स्थापनेमुळे वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाच्या संधी वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः एम्स नागपूरने अल्पावधीतच वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उत्कृष्ट आरोग्यसेवांचे केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, सध्याचे युग हे आरोग्यसेवा क्षेत्रातील जलद परिवर्तनाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्यसेवा आणि प्रगत संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील आरोग्यसेवा दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजात डॉक्टरांना उच्च स्थान असून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, याची जाणीव ठेवून रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हे डॉक्टरांचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी तरुण डॉक्टरांना आयुष्यभर शिकत राहण्याचा आणि नवोन्मेष, संशोधन यांचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला. “तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, सचोटी आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी डॉक्टरांनी नेहमी मानवी मूल्ये जपावीत, असे आवाहन केले.

शेवटी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानवतेची सेवा करण्याची अद्वितीय संधी मिळाल्याचे सांगत, ही जबाबदारी अभिमानाने आणि संवेदनशीलतेने पार पाडावी, असे आवाहन केले. तसेच पदवीधर विद्यार्थी केवळ वैयक्तिक यशच नव्हे तर देशाच्या आरोग्यदायी भविष्यातही महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande