अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणातील कॉल डिटेल्स यादी केली जाहीर
मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातसोबत संपर्कात असलेल्या अ
Anjali Damania Releases Call Detail Records Kharat Case


मुंबई, 15 एप्रिल (हिं.स.)। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातसोबत संपर्कात असलेल्या अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांची कॉल डिटेल्स यादी जाहीर केली असून, या प्रकरणाचे धागेदोरे किती खोलवर गेले आहेत, याचा अंदाज यावरून येत आहे.

दमानिया यांनी सांगितले की, अशोक खरात हा एकट्याने इतका मोठा झाला नाही, तर त्यामागे काही प्रभावशाली राजकारणी आणि अधिकारी यांचे पाठबळ होते. काही जण फक्त भविष्य जाणून घेण्यासाठी गेले असतील, मात्र काही जण ठराविक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

खरातला फोन केलेल्यांची यादी पुढे

नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, तसेच चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे (सिन्नरमधून निवडणूक लढलेले), विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भुसे यांचे पीए), दीपक केसरकर, तसेच राहुल कोतडे (ओएसडी विखे पाटील), प्रभाकर काळे यांची नावेही जाहिर केली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉल डिटेल्सही समोर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दमानिया म्हणाल्या की, तसेच या यादीत नवीन नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे नाव असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना दमानिया म्हणाल्या की, जयंत पाटील यांचे नाव पाहून मला धक्का बसला असून जयंत पाटलांकडून अशी अपेक्षा नव्हती. “अशा बाबांकडे भविष्य विचारायला त्यांना कोण घेऊन गेले माहीत नाही. कदाचित मी चुकीची असेन, परंतु आतापर्यंत ते मला चांगले वाटत होते,” असेही त्यांनी नमूद केले.

खरातला फोन करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची नावे

दिपक लोंढे; बाळासाहेब बोराडे ; नंदकिशोर काटोरे हे डॉक्टर आहेत, सचिन चुंबाळे ; मंगेश नवाळे ; राहुल देशमुख ; अविनाश पोटे ; कमलाकर पोटे ; महेंद्र शेळके-पाटील ; तहसीलदार. जिल्हाधिकारी पोलिस अधिकारी असे अनेक अधिकारी खरातच्या संपर्कात होते

विशेषतः रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याला तब्बल १७७ फोन केले असल्याचा दावा दमानिया यांनी केला. एका दिवशी २२ मिनिटांचे संभाषण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर यांची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, महिना उलटूनही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि एसआयटीकडे यासाठी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

दमानिया यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, जानेवारी २०२६ दरम्यान समता पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात फायनान्शियल ट्रान्झेक्शन झाले होते. २७ ते २९ जानेवारी या तीन दिवसांत सुमारे ५ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे १८ जानेवारी रोजी अवघ्या ३४ सेकंदांत सहा ट्रान्झेक्शन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या दिवशी अशोक खरात ठाण्यात असल्याचे टॉवर लोकेशनवरून दिसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या सर्व घटनांचा काही संबंध अजित पवार यांच्या घराबाहेर घडलेल्या कथित भानामती प्रकाराशी असू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, याबाबत ठोस निष्कर्ष काढण्याचे काम तपास यंत्रणांचे असल्याचे सांगत त्यांनी थेट आरोप करण्याचे टाळले.

या प्रकरणात कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना अटक झाल्यास मोठे षड्यंत्र उघड होईल, असा दावा करत त्यांना जाणीवपूर्वक लपवले जात असल्याचा आरोपही दमानिया यांनी केला. तसेच अभिजित भांडे पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ईओडब्ल्यूने अजून चौकशी का केली नाही. ईडीच्या अंतर्गत येत नाही. इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगने याची चौकशी करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande