पारदर्शकता व प्रामाणिकतेने विकसित भारताचे लक्ष्य गाठावे- राष्ट्रपती
एनएडीटीच्या प्रशिक्षणार्थींना दीक्षांत प्रसंगी केले आवाहन नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास याला प्राधान्य देऊन विकसित भारताचे लक्ष्य गाठावे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नागपूरच्या राष्ट्रीय
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू


एनएडीटीच्या प्रशिक्षणार्थींना दीक्षांत प्रसंगी केले आवाहन

नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास याला प्राधान्य देऊन विकसित भारताचे लक्ष्य गाठावे असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणार्थींना आज, बुधवारी संबोधित करताना त्या बोलत होत्या.

याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाल्या की एनएडीटी ही एक अत्यंत प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था असून, तिने अनेक दशकांपासून देशाच्या प्रत्यक्ष कर प्रशासन व्यवस्थेला बळकट करणारे अधिकारी घडवले आहेत. येथे मिळणारे प्रशिक्षण केवळ कायदे व प्रक्रियांपुरते मर्यादित नसून, ते लोकसेवेची भावना, नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची सखोल समज विकसित करते. देशाच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना सांगण्यात आले की प्रत्यक्ष कर संकलनातील सातत्यपूर्ण वाढ, कर अनुपालनातील सुधारणा आणि कर आधाराचा विस्तार हे नागरिक व प्रशासन यांच्यात वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या गतीला कायम ठेवण्यासाठी प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि समावेशकता अत्यंत आवश्यक असल्याचेही अधोरेखित केले.प्राचीन भारतीय विचारक कौटिल्य यांच्या कर सिद्धांताचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की कर संकलन असे असावे की ते जनतेवर अनावश्यक भार टाकणार नाही, जसे मधमाशी फुलांना इजा न करता मध गोळा करते. हा विचार कराधान हे केवळ महसूलाचे साधन नसून राज्य आणि नागरिकांमधील विश्वासाचा सेतू असल्याचे स्पष्ट करतो.

गेल्या 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या आयकर अधिनियम, 2025 ला ऐतिहासिक सुधारणा म्हणून संबोधण्यात आले असून, तो आधुनिक, सोपा आणि पारदर्शक कर प्रणालीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुधारणेचे यश तिच्या निष्पक्ष व प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असून, त्याची जबाबदारी नवप्रशिक्षित अधिकाऱ्यांवर असेल.

भारतीय महसूल सेवेतील अधिकारी केवळ कर संकलक नसून ते जनविश्वास, न्याय आणि निष्पक्षतेचे संरक्षक आहेत, असेही नमूद करण्यात आले. डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या तंत्रज्ञानाधारित प्रणालींच्या वापरामुळे प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय कराधान क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सहभागाचा उल्लेख करताना मुर्मू म्हणाल्या की द्विपक्षीय व बहुपक्षीय करारांमुळे जागतिक कर प्रणाली अधिक सोपी व प्रभावी होत असून, भारतात व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे.

तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता अंगीकारण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा आणि मूल्यांकनाचा परिणाम देशाच्या विकासावर व सामाजिक न्यायावर होत असल्याचेही स्मरण करून देण्यात आले. स्वैच्छिक कर अनुपालन वाढवण्यासाठी करदात्यांचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच ‘अमृत काळ’ हा संधी आणि जबाबदारींचा काळ आहे, ज्यात प्रत्येक अधिकाऱ्याने प्रामाणिकता, निष्पक्षता आणि राष्ट्रसेवा हे आपले सर्वोच्च ध्येय मानण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande