
पाटणा , 15 एप्रिल (हिं.स.)।बिहारमध्ये आज पहिल्यांदाच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. सकाळी 11 वाजता पाटणा येथील लोकभवनात सम्राट चौधरी यांनी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत जनता दल युनायटेड चे आमदार विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या आमदार दलाचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर सम्राट चौधरी यांनी राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा सादर केला होता.
माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांना मखान्याची माळ घालून आपली राजकीय परंपरा सोपवली. आज सकाळी लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत विजय चौधरी आणि बिजेंद्र यादव यांनीही शपथ घेतली. हे दोघे जेडीयू कोट्यातून उपमुख्यमंत्री झाले आहेत. शपथविधी समारंभात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, तसेच माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि एनडीएतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
2020 मध्ये नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपने दोन उपमुख्यमंत्री दिले होते—रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद. त्यानंतर दोन वेळा एनडीए सरकारच्या शपथविधीत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने जेडीयूमधून दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत.
पूर्वी चर्चा होती की नीतीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री होतील, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे जेडीयूने भूमिहार समाजातील विजय चौधरी आणि यादव समाजातील बिजेंद्र यादव यांची निवड केली. हे दोघेही नीतीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सम्राट चौधरी म्हणाले की, “भाजपने मला आयुष्यात सेवा करण्याच्या अनेक संधी दिल्या. मी जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहे. 2015 पासून मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. आता मिळालेली ही मोठी जबाबदारीही मी पूर्ण निष्ठेने निभावेन.”
त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संघटन महासचिव बी. एल. संतोष, शिवराज सिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांचे आभार मानले. तसेच “विकसित भारत” या मोदींच्या दृष्टिकोनासह आणि नीतीश कुमार यांच्या “समृद्ध बिहार” संकल्पासह राज्याचा विकास करू, असेही त्यांनी सांगितले.
कुशवाहा समाजातील सम्राट चौधरी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 रोजी झाला. त्यांनी 1990 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि सुरुवात राष्ट्रीय जनता दलातून केली. त्यानंतर जेडीयू, हम आणि शेवटी भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी दीर्घ राजकीय प्रवास केला आणि आता बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode