
रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)। रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थेरोंडा खंडेरावपाडा (पो. चौल, ता. अलिबाग) येथे मटका जुगार चालवणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र एकनाथ माहीमकर (वय ६२, रा. थेरोंडा खंडेरावपाडा) हा आपल्या घराच्या मागील नारळ-सुपारीच्या वाडीत मोकळ्या जागेत ‘कल्याण मेन’ नावाचा मटका जुगार बेकायदेशीररित्या चालवत होता. तो लोकांकडून पैसे स्वीकारून चिठ्ठ्यांवर आकडे लिहून जुगाराचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ६०० रुपये रोख रक्कम (५०० व १०० रुपयांच्या नोटा), तसेच ओएक्स हाऊसेर कंपनीचा निळ्या शाईचा पेन आणि आकडेमोडीशी संबंधित साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तक्रार पोलीस कर्मचारी सिद्धेश सुभाष शिंदे (वय ३२) यांनी दिली आहे. ही कारवाई सपोनि बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार आर. के. थळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)