
इस्लामाबाद , 16 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या संस्थापक सदस्यांपैकी एक आमिर हमजा याच्यावर लाहोरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
हमजाने 1985 ते 1986 दरम्यान दहशतवादी हाफिज सईद याच्यासोबत मिळून लष्कर-ए-तैयबाची स्थापना केली होती. त्याचे नाव भारतासह जगभरातील अनेक दहशतवादी कारवायांशी जोडले गेले आहे. सईदनंतर त्याला लष्करमधील दुसरा सर्वात महत्त्वाचा नेता मानले जाते आणि अमेरिकेनेही त्याला दहशतवादी घोषित केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, लाहोरमधील एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.
1959 साली जन्मलेला आमिर हमजा हा एक मोठा दहशतवादी आहे. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख विचारवंत म्हणून तो ओळखला जातो आणि तो एक प्रभावी वक्ता तसेच लेखकही आहे. काही काळ त्याने या संघटनेच्या अधिकृत प्रकाशनाचे संपादनही केले होते. त्याने अनेक पुस्तके लिहिली असून, त्यात 2022 मध्ये प्रकाशित झालेले ‘काफिला दावत आणि शहादत’ (प्रचार आणि शहादतीचा कारवाँ) हे पुस्तकही समाविष्ट आहे.
2018 मध्ये पाकिस्तान सरकारने जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन यांसारख्या कथित धर्मादाय संस्थांमार्फत चालणाऱ्या लष्करच्या निधीपुरवठा मार्गांवर कठोर कारवाई केल्यानंतर, हमजाने स्वतःला लष्करपासून दूर केल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्याने ‘जैश-ए-मनकफा’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि लष्करसाठी निधी गोळा करणे सुरूच ठेवले. या निधीचा वापर जम्मू आणि काश्मीरसह इतर ठिकाणी दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचे सांगितले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode