
रायगड, 16 एप्रिल (हिं.स.)।सोशल मीडियावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी रघुजीराजे आंग्रे आणि अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेत तक्रार अर्ज सादर केला.
पुणे येथील रमेश भिडे या व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे व आंग्रे घराण्याबद्दलही अपमानास्पद उल्लेख करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही आक्षेपार्ह भाष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी याप्रकरणी तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)