
इस्लामाबाद, 18 एप्रिल (हिं.स.) सरफराज अहमद यांची पाकिस्तान कसोटी संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरफराज यांच्यासोबत असद शफीक यांची फलंदाजी प्रशिक्षक आणि उमर गुल यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शान मसूद यांच्या नेतृत्वाखालील या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू सत्राचा एक भाग आहे, ज्यामध्ये पाकिस्तान सध्या पाचव्या स्थानावर असून आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. संघात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
यावेळी निवड समितीने युवा क्रिकेटपटूंवर विश्वास दाखवला आहे. अब्दुल्ला फजल, अमद बट, अझान अवैस आणि गाझी घोरी यांचा कसोटी संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. डावखुरे फलंदाज फजल आणि अवैस यांनी विशेषतः सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे, तर अमद बट एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी ८ ते १२ मे दरम्यान शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी १६ ते २० मे दरम्यान सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल. मालिकेपूर्वी, पाकिस्तानी क्रिकेटपटू आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी २७ एप्रिल ते १ मे दरम्यान कराची येथे लाल चेंडूच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होतील.
पाकिस्तान कसोटी संघ: शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला फजल, अमद बट, अझान अवैस, बाबर आझम, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, गाझी घोरी, नोमान अली, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे