
वॉशिंग्टन , 19 एप्रिल (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमचे प्रतिनिधीमंडळ (सोमवारी) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जात आहे. त्यांनी दावा केला की, त्यांनी एक नवा पारदर्शक आणि न्याय्य करार प्रस्तावित केला आहे. जर इराणने हा करार मान्य केला नाही, तर आम्ही त्यांच्या वीज प्रकल्पांना आणि पुलांना उद्ध्वस्त करू, असा इशाराही त्यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हणाले, “इराणने काल होर्मुज सामुद्रधुनीत गोळीबार केला. हा आमच्या युद्धविराम कराराचा पूर्ण भंग आहे. यातील अनेक गोळ्या एका फ्रेंच जहाजावर आणि ब्रिटनच्या मालवाहू जहाजावर डागण्यात आल्या. हे चांगले नव्हते, बरोबर ना? आमचे प्रतिनिधी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे जात आहेत. ते उद्या संध्याकाळपर्यंत तेथे पोहोचतील, जिथे चर्चा होणार आहे.”ते पुढे म्हणाले, “इराणने अलीकडेच होर्मुज सामुद्रधुनी बंद करत असल्याची घोषणा केली. हे विचित्र आहे, कारण आमच्या नाकेबंदीमुळे ती आधीच बंद आहे. ते नकळत आमच्याच कामी येत आहेत. हा मार्ग बंद असल्यामुळे त्यांचे दररोज सुमारे ५० कोटी डॉलरचे नुकसान होत आहे.”
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले, “अमेरिकेला यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. उलट अनेक जहाजे अमेरिकेकडे येत आहेत. टेक्सास, लुइझियाना आणि अलास्का येथे तेल भरण्यासाठी ती येत आहेत. हे सर्व आयआरजीसीच्या कृपेने घडत आहे, जे नेहमीच स्वतःला ‘शक्तिशाली’ दाखवण्याचा प्रयत्न करतात.”ते पुढे म्हणाले, “आम्ही अतिशय निष्पक्ष आणि न्याय्य करार देत आहोत. मला आशा आहे की ते तो स्वीकारतील. कारण जर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर संयुक्त राज्य अमेरिका इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि प्रत्येक पूल उद्ध्वस्त करेल.”
“आता नरम भूमिका संपली! ते वेगाने कोसळतील, सहज कोसळतील. जर त्यांनी करार स्वीकारला नाही, तर जे करणे आवश्यक आहे ते करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. मागील ४७ वर्षांत इराणबाबत जे इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते, ते आता करण्याची वेळ आली आहे.”“आता इराणच्या हत्या मशीनचा अंत करण्याची वेळ आली आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode