
नवी दिल्ली, 19 एप्रिल (हिं.स.) भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) प्रशिक्षक नवल सिंग यांना तात्काळ प्रभावाने काढून टाकले. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते नवल सिंग यांच्यावर पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमित अंतिलने मानसिक छळ आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
सुमितने भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (SAI) नवल सिंग यांच्या विरोधात तक्रार केली होती. पीसीआयचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया म्हणाले, नवल यांना सर्व उपक्रमांमधून काढून टाकण्यात आले आहे. सुमित अंतिल व्यतिरिक्त इतर खेळाडूंनीही त्यांच्या विरोधात तक्रार केली होती.
झाझरिया म्हणाले की, तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. खेळाडूंना त्यांच्या चिंता व्यक्त करण्याची पुरेशी संधी देण्यात आली. आरोप गंभीर असल्याने आणि गैरवर्तनाचे प्राथमिक पुरावे असल्याने, पीसीआयने तातडीची बैठक घेतली. तोंडी सुनावणी आणि लेखी तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर, समितीने प्रशिक्षक नवल सिंग यांची सेवा तात्काळ समाप्त करण्याचा एकमताने निर्णय घेतला.
२०१५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले नवल, सध्या सचिन यादवला प्रशिक्षण देत आहेत. सुमित अंतिलने असाही आरोप केला आहे की, नवल 'बहुधा मानसिकदृष्ट्या अस्थिर' असून ते त्यांच्यासारख्या आणि नीरज चोप्रासारख्या अव्वल खेळाडूंना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.
तो पुढे म्हणाला की, नवल सिंगने आमचा मानसिक छळ केला आणि माझ्या व नीरजच्या कुटुंबांना वाईट वागणूक दिली. नवलने जाणूनबुजून आपल्या अपमानजनक वक्तव्यांचे रेकॉर्डिंग आमच्या (संघाच्या) व्यवस्थापकांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे