जागतिक तणावामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला
मुंबई, 02 एप्रिल (हिं.स.)।भारतीय शेअर बाजार गुरुवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. सेन्सेक्स सुमारे १३०० हून अधिक अंकांनी घसरला, तर बुधवारी झालेल्या वाढीनंतर निफ्टी २२,२५० च्या खाली आला. इराण-अमेरिका तणावाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच
जागतिक तणावामुळे शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला


मुंबई, 02 एप्रिल (हिं.स.)।भारतीय शेअर बाजार गुरुवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. सेन्सेक्स सुमारे १३०० हून अधिक अंकांनी घसरला, तर बुधवारी झालेल्या वाढीनंतर निफ्टी २२,२५० च्या खाली आला. इराण-अमेरिका तणावाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर गुंतवणूकदारांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने बाजारात मोठी घसरण दिसून आली. सकाळी ९.३९ वाजता सेन्सेक्स १,३९४.३८ (-१.९०%) अंकांनी घसरून ७१,७३९.९४ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ४०७.७५ (-१.८०%) अंकांनी घसरून २२,२७१.६५ वर पोहोचला. या काळात बँकिंग आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास २ टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स १,४३३.७२ अंकांनी (१.९६%) घसरून ७१,७००.६० वर आला. तर ५० शेअर्सचा एनएसई निफ्टी ४४५.७० अंकांनी (१.९७%) घसरून २२,२३३.७० या स्तरावर पोहोचला.

याच्या अगोदर बुधवारी सेन्सेक्स १,१८६.७७ अंकांच्या उसळीने ७३,१३४.३२ वर आणि निफ्टी ३४८ अंकांच्या वाढीसह २२,६७९.४० वर बंद झाला होता. बाजारातील या मोठ्या घसरणीमागे जागतिक भू-राजकीय तणाव हा प्रमुख घटक असल्याचे मानले जात आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी. के. विजयकुमार यांच्या मते, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर कठोर कारवाई करू’ अशी घोषणा केल्यानंतर बाजारातील भावना पुन्हा नकारात्मक झाल्या आहेत.”

या लष्करी तणावाच्या भीतीमुळे ऊर्जा बाजारातही मोठे चढ-उतार दिसून आले. कच्चे तेल: जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड सुमारे ४.४४ ते ५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०५.६५ डॉलरवर पोहोचले. बॉन्ड यील्ड आणि कमोडिटी: अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँड यील्डमध्ये वाढ होऊन ती ४.३६ टक्क्यांवर गेली, ज्याचा सोने-चांदीच्या किमतींवर किरकोळ नकारात्मक परिणाम झाला.

परदेशी निधीची माघार: एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, बुधवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ८,३३१.१५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ७,१७१.८० कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराला काहीसा आधार देण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्व ३० कंपन्यांचे शेअर्स तोट्यात होते. सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये सन फार्मा, इंडिगो, अदाणी पोर्ट्स, इटरनल, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेंट, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि पॉवरग्रिड यांचा समावेश होता. याचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही. अमेरिकन बाजार बुधवारी वाढीसह बंद झाले असले तरी गुरुवारी आशियाई बाजारांमध्ये मोठी विक्री झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ४.३१ टक्के, जपानचा निक्केई २.२४ टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग १.०४ टक्के आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी घसरला.

भारतीय रुपयाने ऐतिहासिक नीचांकी स्तरावरून मजबूत पुनरागमन करत गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १५१ पैशांची वाढ नोंदवली. भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ऑनशोर फॉरवर्ड डिलिव्हरी मार्केट’मध्ये बँकांच्या नेट ओपन पोझिशनवर मर्यादा घालण्याच्या तातडीच्या निर्णयामुळे ही तेजी दिसून आली. आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया ९४.६२ वर उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत वाढत ९३.१९ पर्यंत पोहोचला. मागील बंद भावाच्या तुलनेत रुपया १५१ पैशांनी म्हणजेच १.६ टक्क्यांनी मजबूत झाला.

जागतिक अस्थिरतेचा थेट परिणाम भारतीय रुपया आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वी. के. विजयकुमार यांनी इशारा दिला आहे की कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, वाढता व्यापार तुटीचा दबाव, परदेशातून येणाऱ्या रकमेतील (रेमिटन्स) संभाव्य घट आणि एफपीआयची सातत्याने होणारी विक्री यामुळे रुपयावर दबाव कायम आहे.

आरबीआयने डॉलर फ्युचर्स व्यवहारांवर निर्बंध आणले असले तरी हा दबाव पूर्णपणे कमी झालेला नाही. पुढील काळात बाजार आणि अर्थव्यवस्थेची दिशा मोठ्या प्रमाणात पश्चिम आशियातील लष्करी घडामोडींवर अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande