आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत एंजल वनचा नफा ३२० कोटींवर, महसूल १,४६७ कोटींवर
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - एंजल वन लिमिटेड (एनएसई: एंजनवन, बीएसई: ५४३२३५) या आघाडीच्‍या फिनटेक प्‍लॅटफॉर्मने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित केलेले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने सर्व प्रमुख आर्थिक आणि ऑपरेटिंग
Angel One


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) - एंजल वन लिमिटेड (एनएसई: एंजनवन, बीएसई: ५४३२३५) या आघाडीच्‍या फिनटेक प्‍लॅटफॉर्मने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित केलेले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने सर्व प्रमुख आर्थिक आणि ऑपरेटिंग निकषांवर सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे.

एंजल वनने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. कंपनीचा करोत्तर नफा (पीएटी) मागील तिमाहीच्या तुलनेत १९.२ टक्‍क्‍यांनी वाढून ३२० कोटी रूपयांवर पोहोचला आहे, तर महसूल ९.७ टक्‍क्‍यांनी वाढून १,४६७ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. ईबीआयटीडीए १६.७ टक्‍यांनी वाढून ४७३ कोटी रूपयांवर पोहोचला आहे, तर मार्जिन ३९.४ टक्‍क्‍यांवरून ४१.७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. या कामगिरीमधून कंपनीची ऑपरेटिंग लाभक्षमता व सुधारित कार्यक्षमता दिसून येते.

या तिमाहीत प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. एकूण ऑर्डर्सची संख्या ४३१ दशलक्षवर पोहोचली आहे, जो मागील सहा तिमाहींमधील उच्‍चांक आहे. यावरून प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांचा वाढता सहभाग दिसून येतो. तसेच, सरासरी क्लायंट फंडिंग बुक ५,८५० कोटी रूपयांवर स्थिर राहिले आहे.

ब्रोकिंग व्‍यतिरिक्त एंजल वनने आपल्या वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्मवर गती कायम ठेवली आहे. या तिमाहीत एसआयपी नोंदणी २.१ दशलक्ष इतकी राहिली, तर संपत्ती व्‍यवस्‍थापन व्यवसायाने वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये एयूएम मागील तिमाहीच्या तुलनेत २२.७ टक्‍यांनी वाढून १०,०८० कोटी रूपये झाले आहे. क्रेडिट (कर्ज), म्युच्युअल फंड आणि अॅसेट मॅनेजमेंट यांसारखे उदयोन्मुख व्यवसाय वेगाने विस्तारत आहेत, जे व्यवसायाचे विविधीकरण आणि ग्राहकांशी सखोल संबंध प्रस्थापित करण्यात मोलाचे योगदान देत आहेत.

दुसरीकडे, कंपनीने भविष्यातील वाढीला पाठबळ देण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी)च्या माध्यमातून १,५०० कोटी रूपये उभे करण्याच्या योजनेला मंजूरी दिली आहे, तसेच आपली कर्ज घेण्याची मर्यादा २०,००० कोटी रूपयांपर्यंत वाढवली आहे.

या कामगिरीबाबत मत व्‍यक्त करत ग्रुप सीईओ श्री. अंबरीष केंघे म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ ची चौथी तिमाही एकूण अत्यंत दमदार कामगिरीची ठरली. ग्राहकांच्या व्यवहारांमधील वाढीमुळे आमचे ईबीडीएटी मार्जिन जवळपास ४२ टक्‍क्‍यांपर्यंत विस्तारले आणि करोत्तर नफा ३.२ बिलियन रूपयांवर पोहोचला. मार्च २०२६ मध्ये सरासरी दैनिक ऑर्डर्सची संख्या ७.४ दशलक्षपर्यंत पोहोचली, ज्यामुळे या तिमाहीत एकूण ऑर्डर्सची संख्या ४३१ दशलक्ष झाली आहे, जो गेल्या सहा तिमाहींमधील उच्‍चांक आहे. आमचे क्रेडिट, म्युच्युअल फंड, वेल्थ आणि अॅसेट मॅनेजमेंट हे उदयोन्मुख व्यवसाय ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे सातत्याने विस्तारत आहेत. शिस्तबद्ध अंमलबजावणी, तंत्रज्ञानातील नेतृत्व आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देणे यांवर आमचा भर कायम आहे.”

एंजल वन दीर्घकालीन शाश्वत प्रगती साधण्यासाठी आपल्या तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मला अधिक प्रबळ करण्यावर, ग्राहकांशी सखोल संबंध प्रस्थापित करण्यावर आणि आपल्या उदयोन्मुख व्यवसायांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande