जपानमध्ये रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी
टोकियो , 20 एप्रिल (हिं.स.)।जपानमध्ये सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय प्रसारक एनएचकेनुसार, उत्तर जपानमध्ये रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यानंतर किनारी भागांसाठी सुनामीचा इशारा जारी
जपानमध्ये रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी


टोकियो , 20 एप्रिल (हिं.स.)।जपानमध्ये सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय प्रसारक एनएचकेनुसार, उत्तर जपानमध्ये रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यानंतर किनारी भागांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाने विशेषतः इवाते प्रीफेक्चर आणि होक्काइदोच्या किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी किंवा उंच भागात जाण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समुद्रात 3 मीटरपर्यंत उंच लाटा उसळू शकतात, ज्यामुळे किनारपट्टीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. जपान सरकारने इशारा दिला आहे की, सुनामीच्या लाटा एकदाच नव्हे तर अनेक वेळा येऊ शकतात. त्यामुळे सर्व इशारे मागे घेईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच थांबावे. तसेच लाटा निश्चित वेळेपूर्वी किंवा नंतरही येऊ शकतात आणि त्यांची उंची अंदाजापेक्षा अधिक असू शकते, असेही सांगण्यात आले आहे. प्रभावित भागातील नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून तसेच नद्यांच्या मुखाजवळील भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण तेथे पाणी वेगाने भरू शकते. बचाव आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.

जपानमध्ये भूकंप ही नवी बाब नाही. बहुतांश भूकंप सौम्य स्वरूपाचे असतात, मात्र काहीवेळा मोठे भूकंप प्रचंड विध्वंस घडवू शकतात. सन 2011 मध्ये आलेल्या भीषण भूकंप आणि सुनामीमुळे जपानला मोठा फटका बसला होता. ही आपत्ती 2011 तोहोकू भूकंप आणि सुनामी म्हणून ओळखली जाते. या दुर्घटनेत सुमारे 18,500 जण मृत्यूमुखी पडले किंवा बेपत्ता झाले होते, तसेच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात गंभीर अणुदुर्घटना घडली होती. सध्या सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande