नागपूर एनजीओ संचालकास अटक; 23 पर्यंत पोलिस कोठडी
महिलांचा लैंगिक छळ व धार्मीक सक्तीचे प्रकरण नागपूर, 20 एप्रिल (हिं.स.) : नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) प्रमुखावर अनेक तरुणींनी लैंगिक शोषण आणि धार्मिक दबावाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्यात गुन
रियाझ काझी, अटकेतील आरोप


महिलांचा लैंगिक छळ व धार्मीक सक्तीचे प्रकरण

नागपूर, 20 एप्रिल (हिं.स.) : नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) प्रमुखावर अनेक तरुणींनी लैंगिक शोषण आणि धार्मिक दबावाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रियाज फाजिल काजी याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. तसचे कोर्टाने त्याला 23 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

निशिक टीसीएसमधील लैंगिक छळ व धर्मांतरण तसेच अमरावती येथील लैंगिक छळाचे प्रकरणी चर्चेत असतानाच नागपुरात देखील अशाच प्रकारचा गुन्हा उजेडात आला आहे. नागपुरातील एनजीओमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांनी एनजीओ चालक रियाज फाजिल काजी याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणातील मुख्य तक्रारदार ही 23 वर्षीय तरुणी असून ती सप्टेंबर 2023 पासून संबंधित एनजीओमध्ये प्रशासन व एचआर प्रमुख म्हणून कार्यरत होती. एफआयआरनुसार, 18 जुलै 2024 रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर आरोपीने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारून कपाळावर चुंबन घेतल्याचा आरोप आहे. तसेच, “आज मी तुला जाऊ देणार नाही,” असेही आरोपीने म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे विरोध करता आला नाही, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपीने वारंवार शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून एका घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्लग काढून टाकल्याचाही दावा करण्यात आला आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने वागणूक बदलून गैरवर्तन सुरू केल्याचेही पीडितेने नमूद केले आहे.तक्रारदाराने पुढे सांगितले की, आरोपी तिच्यावर नजर ठेवत असे, तसेच तिच्या वैयक्तिक माहितीची चौकशी करत असे. त्याने महिला कर्मचारी व स्वयंसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी बनावट सोशल मीडिया खाते तयार केल्याचाही आरोप आहे.

यासोबतच पीडितेच्या मोठ्या बहिणीवरही धार्मिक प्रथा पाळण्याचा दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. फील्ड व्हिजिटदरम्यान विशिष्ट धर्माच्या प्रार्थना करण्यास आणि ठरावीक प्रकारचे कपडे घालण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याचेही समोर आले आहे. तसेच 2024 मध्ये एनजीओशी संबंधित एका शिक्षिकेनेही अशाच कारणांमुळे नोकरी सोडल्याचे सांगितले जाते. काही कर्मचाऱ्यांनी आरोपीकडून धार्मिक प्रथा लादण्याचा आणि अयोग्य वर्तनाचा अनुभव सांगितला आहे.

पीडित महिलांचा गट 18 एप्रिल रोजी एनजीओच्या कार्यालयात गेला असता ते बंद आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरेश कालसेकर यांनी सांगितले की, सर्व पीडितांशी संपर्क साधून तपास सुरू आहे. आरोपीला अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande