
मुंबई , 20 एप्रिल (हिं.स.)।‘बिग बॉस मराठी ६’च्या ग्रँड फिनालेत तन्वी कोलते हिने विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली आहे. विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलतेला लाखो रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. यासोबतच तिला एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी लाखो रुपयांचे व्हाउचरही मिळाले आहे.
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन रविवारी, १९ एप्रिल रोजी संपन्न झाला. या पर्वात तन्वी कोलते हिने विजेतेपद मिळवले. राकेश बापट हा पहिला उपविजेता ठरला. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमधून विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दीपाली सय्यद यांना बाहेर पडावे लागले होते.
तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफी जिंकत इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकले. तसेच तिने ५ लाख रुपयांचा सूटकेसही नाकारला होता. विजेतेपद मिळवल्यानंतर तन्वीला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. याचबरोबर तिला एक इलेक्ट्रिक स्कूटरही मिळाली. तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी १० लाख रुपयांचे व्हाउचरही देण्यात आले.
‘बिग बॉस मराठी ६’चा ग्रँड फिनाले अतिशय धमाकेदार झाला. अनेक माजी स्पर्धकांनी नृत्य सादरीकरण केले. विशेषतः राखी सावंत हिनेही दमदार डान्स परफॉर्मन्स दिला. सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन आणि जेनेलिया डिसूझा हेही उपस्थित होते. यावेळी रितेश यांनी त्यांच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे प्रमोशनही केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode