
वॉशिंग्टन , 20 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत इराणच्या बंदरांवरील अमेरिकी नाकेबंदी ही शांतता चर्चेत अडथळा ठरत असल्याच्या सूचनेवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली.
दोन्ही नेत्यांमधील दूरध्वनी संभाषणात मुख्यतः होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी आणि इराणसोबतच्या शांतता चर्चेवर भर देण्यात आला. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी मुनीर यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपणार आहे. दरम्यान, नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजाला अमेरिकेने ताब्यात घेतले. ट्रम्प यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली.ट्रम्प म्हणाले की, ओमानच्या आखातात अमेरिकी नौदलाच्या गाईडेड मिसाईल विनाशिकेने त्या जहाजाला अडवले आणि त्याच्या इंजिन कक्षावर गोळीबार करून ते थांबवले. त्यांनी सांगितले की, अमेरिकी मरीन दल सध्या ‘तौसका’ या जहाजाच्या ताब्यात असून त्यामध्ये कोणता माल आहे, याची चौकशी करत आहेत.
इराणविषयक चर्चेसाठी अमेरिकी प्रतिनिधीमंडळ सोमवारी इस्लामाबाद येथे पोहचले आहे. मात्र, तेहरानकडून अद्याप पाकिस्तानातील बैठकीसाठी प्रतिनिधीमंडळ पाठवले जाणार की नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही.इराणी सरकारी दूरदर्शनने एका अज्ञात सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकेच्या अतिशय कठोर आणि अवाजवी मागण्या तसेच वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे चर्चेच्या दुसऱ्या फेरीची कोणतीही योजना नाही. इराणने अमेरिकी नाकेबंदीला युद्धविरामाचे उल्लंघन ठरवले आहे.
या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तान सक्रिय भूमिका बजावत आहे. जनरल असीम मुनीर यांनी नुकताच तेहरान दौरा केला होता. ट्रम्प यांनी यापूर्वी मुनीर यांचे कौतुक करत त्यांना आपले आवडते फील्ड मार्शल म्हटले होते. दोन्ही देशांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीची सुरक्षा आणि शांतता प्रस्थापनेवर चर्चा सुरू आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदीमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होत असून त्यामुळे प्रादेशिक तणाव अधिक वाढत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, इराणवर दबाव आणण्यासाठी ही नाकेबंदी आवश्यक आहे, तर इराण याला युद्धविरामाचे उल्लंघन मानत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode