
वॉशिंग्टन , 21 एप्रिल (हिं.स.)।तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलने आपल्या नेतृत्वात मोठा बदल करत यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या जवळपास 15 वर्षांपासून ॲपलची धुरा सांभाळणारे टिम कुक आता सीईओ पद सोडत असून येत्या १ सप्टेंबरपासून जॉन टर्नस हे ॲपलचे नवे सीईओ असतील. ५० वर्षीय टर्नस सध्या ॲपलच्या हार्डवेअर विभागाचे प्रमुख आहेत.
२०११ मध्ये ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर ६५ वर्षीय टिम कुक यांनी सीईओपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ॲपलने यशाची नवी शिखरे गाठली. याच काळात कंपनीचे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले. त्यांनी उत्पादनासाठी चीनवरील कंपनीचे अवलंबित्व कमी करून भारतासारख्या देशांकडे कंपनीचे लक्ष केंद्रित केले. सप्टेंबरपासून कुक हे एक्झिक्युटिव्ह चेअरमनची भूमिका पार पाडतील.
टिम कुक यांनी एका निवेदनात म्हटले, “ॲपलचा सीईओ होणे आणि इतक्या विलक्षण कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला जाणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. मला ॲपलवर मनापासून प्रेम आहे आणि इतक्या प्रतिभावान, नाविन्यपूर्ण, सर्जनशील आणि संवेदनशील लोकांच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.”
जॉन टर्नस हे ॲपलमधील त्या मोजक्या निवडक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी कंपनीच्या सर्वात खास आणि लोकप्रिय उत्पादनांना आकार देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. जॉन टर्नस हे ॲपलच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आयफोन, आयपॅड आणि मॅकमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची देखरेख त्यांनी केली आहे. जॉन टर्नस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. ॲपलमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी व्हर्च्युअल रिसर्च सिस्टिम्समध्ये काम केले होते. ते २००१ मध्ये ॲपलमध्ये दाखल झाले आणि २०१३ मध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंगचे व्हाइस प्रेसिडेंट बनले. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांचा कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह टीममध्ये समावेश करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode