
पुणे–जबलपूर गाडी कायमस्वरूपी
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) : भुसावळमार्गे पुण्याला जाणाऱ्या तसेच उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधुनिक सुविधांनी सज्ज ‘पुणे–बनारस अमृत भारत एक्सप्रेस’ येत्या 24 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, सध्या विशेष गाडी म्हणून धावणारी ‘पुणे–जबलपूर एक्सप्रेस’ आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या भुसावळ जंक्शनमार्गे धावणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः शिक्षण व नोकरीनिमित्त पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना आता प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.‘अमृत भारत एक्सप्रेस’ ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन असून ती पुणे आणि बनारस दरम्यान धावणार आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलहून सुटणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये स्लीपर आणि जनरल क्लाससह एकूण 22 डबे असतील.या गाडीचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणासंबंधी माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, लवकरच रेल्वेकडून ती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, हडपसर (पुणे), दौंड, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी जंक्शन, प्रयागराज जंक्शन आणि बनारस (वाराणसी) या स्थानकांवर या गाडीला थांबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुणे–जबलपूर मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे विशेष गाडी चालवण्यात येत होती. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन ही गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. 02131/02132 या क्रमांकाने धावणारी विशेष गाडी आता 20191/20192 या नव्या क्रमांकाने ‘पुणे–जबलपूर एक्सप्रेस’ म्हणून सुरू राहणार आहे. यास केंद्रीय रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाली आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर