टोरोंटो न्यायालयाकडून भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव हत्येतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
ओटावा, 21 एप्रिल (हिं.स.)।टोरोंटो येथील एका न्यायालयाने भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला मानसिक आजाराच्या आधारावर फौजदारी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी न्यायालयाने फे
टोरोंटो न्यायालयाकडून भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव हत्येतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


ओटावा, 21 एप्रिल (हिं.स.)।टोरोंटो येथील एका न्यायालयाने भारतीय विद्यार्थी कार्तिक वासुदेव हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला मानसिक आजाराच्या आधारावर फौजदारी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

टोरोंटो उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जेन केली यांनी आरोपी रिचर्ड एडविन याला दोन वेगवेगळ्या हत्याप्रकरणांत प्रथम श्रेणी खुनाचा दोषी ठरवले. या हत्या ७ एप्रिल आणि ९ एप्रिल २०२२ रोजी घडल्या होत्या. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, न्यायालयाने त्याला पॅरोलची कोणतीही संधी न देता जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपीने २१ वर्षीय कार्तिक वासुदेव यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याची कबुली दिली होती. मात्र, बचाव पक्षाने दावा केला होता की, घटनेच्या वेळी तो स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याला योग्य-अयोग्य यातील फरक कळत नव्हता. त्यामुळे त्याला फौजदारीदृष्ट्या जबाबदार धरू नये.

न्यायालयाने आरोपी मानसिक आजाराशी झुंज देत असल्याचे मान्य केले, मात्र त्याला आपल्या कृत्याचे स्वरूप समजत नव्हते, हा दावा मान्य केला नाही. याच आधारावर न्यायालयाने एनसीआर (फौजदारीदृष्ट्या उत्तरदायी नाही) ही याचिका फेटाळून लावली. निर्णयात न्यायालयाने नमूद केले की, कार्तिक वासुदेव हे शेरबोर्न स्टेशनजवळ ब्लूर स्ट्रीट ईस्ट येथील पायऱ्यांकडे जात होते. त्यावेळी आरोपी वेगाने त्यांच्या जवळून गेला, नंतर पुन्हा मागे वळून त्यांच्या पाठीवर अनेक गोळ्या झाडल्या.

कार्तिक वासुदेव हा गाझियाबाद येथील रहिवासी होता आणि सेनेका कॉलेजमध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण घेत होता. तो जानेवारी २०२२ मध्ये उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेला होता. मात्र काही महिन्यांतच त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार झाल्याचे सांगितले गेले होते.

कार्तिक यांचे वडील जितेश वासुदेव यांनी सांगितले की, चार वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर कुटुंबाला न्याय मिळाला आहे. ते आणि त्यांची पत्नी अंतिम सुनावणीसाठी कॅनडामध्ये उपस्थित होते.

हत्यानंतर कार्तिक यांचे पार्थिव भारतात आणण्यात आले होते आणि गाझियाबादमधील हिंडन नदीकिनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या धाकट्या भावाने मुखाग्नी दिला होता. कुटुंब राजेंद्र नगर येथील ट्रान्स-हिंडन भागात राहते. कार्तिक हे स्थानिक डीएव्ही शाळेचे माजी विद्यार्थी होते. या निर्णयानंतर कुटुंबाने समाधान व्यक्त करत, दीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande