
मुंबई, 21 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी घडलेल्या अत्यंत गंभीर प्रकारामुळे मध्य रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर आमनेसामने येण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि संभाव्य जीवितहानी टाळली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी फास्ट लोकल नियोजित ४ नंबर प्लॅटफॉर्मऐवजी अचानक ५ नंबर प्लॅटफॉर्मकडे वळली. मात्र त्या प्लॅटफॉर्मवर आधीच एक लोकल उभी होती. समोरच गाडी दिसताच मोटरमनने तातडीने ब्रेक लावले. या वेळी दोन्ही गाड्यांमध्ये केवळ सुमारे १२० मीटरचे अंतर उरले होते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक होती, परंतु योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. प्राथमिक तपासात सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक नियंत्रण व्यवस्थेत झालेल्या त्रुटीमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तज्ज्ञांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून तांत्रिक बिघाडाचा कोनही तपासला जात आहे.
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली, तर प्लॅटफॉर्मवरील दुसरी गाडी दुसऱ्या ट्रॅकवरून पुढे पाठवण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव सीएसएमटी स्थानकावरील ५ ते ८ क्रमांकाचे प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले. परिणामी दुपारी ३.१८ वाजल्यापासून लोकल सेवा विस्कळीत झाली आणि संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. 20 ते 25 मिनिटे लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.
दरम्यान, याच काळात कल्याण ते सीएसटी दरम्यान धावणारी जलद लोकल मज्जीद बंदर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे थांबवावी लागली. गाडी अचानक थांबल्याने काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत स्थानक गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले. गाड्या सुरक्षितपणे मागे घेतल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
विशेष म्हणजे, मंगळवारी दिवसभरात रेल्वे व्यवस्थेत हा तिसरा बिघाड ठरला. पहाटे खर्डी स्टेशन येथे घेतलेला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ चालला, तर त्यानंतर डोंबिवली स्टेशन येथेही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेण्यात आल्याने लोकल सेवा उशिराने सुरू झाली होती. या सलग घडामोडींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे आणि नियोजनातील त्रुटींमुळे लोकल सेवेला फटका बसत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule