
नवी दिल्ली, 21 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता थांबवण्यात आला. पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी तसेच तामिळनाडूमधील सर्व 234 जागांसाठी गुरुवारी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक प्रचार पूर्णपणे थांबवण्यात आला असून ‘सायलेंस पीरियड’ लागू करण्यात आला आहे. नियमांनुसार मतदानाच्या 48 तास आधी प्रचारावर पूर्ण बंदी लागू होते, जेणेकरून मतदार कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील. हे तरतूद लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 126 अंतर्गत लागू आहे. या काळात रॅली घेता येत नाहीत तसेच टीव्ही, वृत्तपत्रे किंवा सोशल मीडियावर प्रचार करणेही प्रतिबंधित आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे.मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि शंभर टक्के मतदान सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
तामिळनाडूमध्ये यंदा एकूण 4,023 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्या आघाडीतील थेट लढत अपेक्षित आहे. तसेच अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षामुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 152 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 1,478 उमेदवार रिंगणात असून सुमारे 3.60 कोटी मतदार आपला हक्क बजावतील.मुर्शिदाबाद (22), कूचबिहार (9), जलपाईगुडी (7), अलिपुरद्वार (5), कालिम्पाँग (1), दार्जिलिंग (5), उत्तर दिनाजपूर (9), दक्षिण दिनाजपूर (6), मालदा (12), बीरभूम (11), पश्चिम बर्धमान (9), पूर्व मेदिनीपूर (16), पश्चिम मेदिनीपूर (15), झारग्राम (4), पुरुलिया (9) आणि बांकुडा (12) अशा जागांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात 1,478 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण मतदारसंख्या 3,60,77,171 इतकी असून त्यात 1,84,99,496 पुरुष, 1,75,77,210 महिला आणि 465 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांची थेट लढत भाजपच्या उमेदवाराशी आहे. पश्चिम बंगालच्या 294 सदस्यीय विधानसभेसाठी 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी 152 जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 142 जागांवर मतदान होईल. तर तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी 4 मे रोजी होईल.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी