‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ चा ९ मे रोजी शुभारंभ
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)। तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन … आणि एक्सप्रेशनच्या भन्नाट स्टाईल्स! सोशल मिडियावर प्रदर्शित झालेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकाच्या व्हिडिओने सध्या प्रेक्षकांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिड
Play


मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)।

तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन … आणि एक्सप्रेशनच्या भन्नाट स्टाईल्स! सोशल मिडियावर प्रदर्शित झालेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकाच्या व्हिडिओने सध्या प्रेक्षकांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या व्हिडिओमध्ये १९७०, १९९० आणि आजचे जेन झी या तिन्ही पिढ्या अगदी वेगळ्या अंदाजात स्वतःला व्यक्त करताना दिसत आहेत. कुठे साधेपणा, कुठे सटल इशारे, तर कुठे थेट डिजिटल मदत. प्रत्येक पिढीची स्वतःची वेगळी वाईब यात दिसतेय.

‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवंकोरं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगभूमीवर दाखल होणार असून, एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील मजेशीर प्रवास यानिमित्ताने उलगडणार आहे. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओने नाटकाबद्दलती उत्सुकता वाढवली आहे.

प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची निर्मिती सोनल प्रोडक्शन्सची आहे. तर अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे नंदू कदम निर्माते आहेत.

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांवर भाष्य करणारं हे नाटक कौटुंबिक असून हलक्याफुलक्या ढंगात खूप सुंदर विचार मांडणार आहे. हसत-खेळत नाट्यरसिकांना विचार करायला लावणारा हा अनुभव नक्कीच वेगळा ठरेल. एकूणच, पिढ्या बदलल्या तर स्टाईल बदलते… आणि हाच फरक ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ मध्ये मजेशीर पद्धतीने रंगणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande