
बीड, 22 एप्रिल (हिं.स.)। आष्टी येथे महावितरण कंपनीची महिला सहाय्यक अभियंता महिलेला १८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. एका तक्रारदाराच्या सोलर पॅनेलची तांत्रिक पडताळणी करून देण्यासाठी हिने लाचेची रक्कम मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बीड एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यानुसार सापळा रचून ही यशस्वी कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यात सध्या लाचखोरांविरुद्ध एसीबीने धडाकेबाज मोहीम उघडली आहे.
गेवराई तालुक्यातील एका ग्रामसेवकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती आणि आता महावितरणच्या महिला अधिकाऱ्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून या घटनेमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis