
डोंबिवली, 22 एप्रिल (हिं.स.) : मोबाईलवरून सतत कॉल करून एका तरुणीला त्रास देणाऱ्या गुंडाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी (21 एप्रिल) दुपारी डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर रोड परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद महोम्मद मुस्तफा खान (रा. मुंब्रा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडित तरुणीला वारंवार फोन करून भेटण्याचा आग्रह करत होता. मात्र, तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तो तिला सतत त्रास देत होता.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने घडलेली बाब आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर तिच्या भावाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संबंधित गुंडाला पकडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपीचा पुन्हा फोन आल्यानंतर तरुणीने त्याला डोंबिवलीत भेटण्यास बोलावले.
पूर्वनियोजनानुसार ठरलेल्या ठिकाणी आरोपी आल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला आणि नंतर रामनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi