
नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.) : ईव्हीएमच्या बटणांवर अत्तर, डींक किंवा इतर कुठलाही पदार्थ लावणे याला गंभीर स्वरूपाची छेडछाड मानले जाईल. तसेच हा निवडणुकीतील गुन्हा ठरेल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही आयोगाने म्हंटले आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथे 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. या राज्यांमध्ये प्रचार मोहिमेची सांगता झाली असून मतदानासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
अलीकडे काही राजकीय कार्यकर्ते मतदान आपल्या बाजूने झाले आहे का हे तपासण्यासाठी ईव्हीएमच्या बटणांवर अत्तर किंवा डींक लावतात, असा दावा समोर आला होता. यावर आयोगाने स्पष्ट भूमिका घेत ही कृती बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोणत्याही मतदान केंद्रावर अशी घटना आढळल्यास संबंधित पीठासीन अधिकाऱ्याने तात्काळ सेक्टर अधिकारी किंवा रिटर्निंग अधिकाऱ्याला कळवणे आवश्यक आहे. गरज भासल्यास अशा ठिकाणी पुनर्मतदान (री-पोल) घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.
सर्व मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना ईव्हीएमवरील सर्व उमेदवारांचे बटण स्वच्छ व स्पष्ट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही बटणावर टेप, डींक किंवा अन्य पदार्थ लावलेला नसावा, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच बटणांवर रंग, शाई, अत्तर किंवा रसायन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, कारण यामुळे मतदानाची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, अशा सर्व प्रकारच्या घटना ईव्हीएममध्ये हस्तक्षेप मानल्या जातील आणि त्या गंभीर निवडणूक गुन्ह्यांत मोडतील.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबला. गुरुवारी 23 एप्रिल रोजी राज्यातील 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1478 उमेदवार निवडणूक मैदानात असून सुमारे 3.6 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तमिळनाडूमध्येही 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिमेची सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, एन. चंद्रबाबू नायडू, अरविंद केजरीवाल यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी विविध भागांत प्रचार सभा व रोड शो आयोजित केले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी