
नवी दिल्ली, 22 एप्रिल (हिं.स.)पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महाव्यवस्थापक पदावर चार वर्षे सेवा बजावल्यानंतर या पदावरून पायउतार होणार आहेत. मे २०२२ मध्ये जेफ अलार्डिस यांनी आयसीसीच्या सीईओ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, वसीम यांनी त्यांच्याकडून महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. पीसीबीचे सीईओ म्हणून जवळपास तीन वर्षे काम केल्यानंतर वसीम आयसीसीमध्ये रुजू झाले होते. या अहवालात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, पीसीबीचे हे माजी सीईओ जून महिन्याच्या अखेरीस आपले सध्याचे पद सोडतील आणि जुलैपासून नवीन जबाबदारी स्वीकारतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या दोन वर्षांत आयसीसीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. ज्यामध्ये ऍलार्डिस ज्यांच्या जागी संजोग गुप्ता यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली, इव्हेंट्स विभागाचे प्रमुख ख्रिस टेटली आणि भ्रष्टाचारविरोधी युनिटचे नेतृत्व करणारे ऍलेक्स मार्शल यांचा समावेश आहे. वसीम खान यांच्या राजीनाम्यापूर्वी, टेटली यांच्या जागी गौरव सक्सेना आणि मार्शल यांच्या जागी अँड्र्यू एफग्रेव्ह यांची नियुक्ती झाली आहे.
इंग्लंडमध्ये जन्मलेले वसीम खान यांनी १९९५ ते २००१ या काळात प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळले, तर १९९८ ते २००२ या काळात त्यांनी 'लिस्ट ए' सामने खेळले आहेत. काउंटी क्रिकेट खेळणारे ते पहिले ब्रिटिश-जन्मी मुस्लिम खेळाडू देखील होते. ९० च्या दशकाच्या मध्यापासून ते अखेरपर्यंत त्यांनी वॉर्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व केले. 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये त्यांनी वॉर्विकशायर, ससेक्स आणि डर्बीशायर या संघांचे प्रतिनिधित्व केले. १९९५ मध्ये वॉर्विकशायरने काउंटी विजेतेपद पटकावले, त्या मोहिमेचा ते एक महत्त्वाचा भाग होते; त्या संपूर्ण हंगामात त्यांची फलंदाजीची सरासरी जवळपास ५० इतकी होती.
५५ वर्षीय वसीम खान यांनी ५८ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला असून, १०२ डावांमध्ये ३०.१५ च्या सरासरीने त्यांनी २,८३५ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये त्यांनी ३० सामन्यांतून (२८ डाव) ३०३ धावा जमा केल्या असून, त्यांची सरासरी १२.१२ इतकी राहिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे