
वॉशिंग्टन , 22 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या संरक्षण विभाग (पेंटागॉन) च्या गुप्तचर शाखेच्या नव्या अहवालामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या अहवालात इराणची लष्करी क्षमता अद्याप मोठ्या प्रमाणात मजबूत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे अमेरिकन नेतृत्वाच्या अलीकडील वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी यापूर्वी दावा केला होता की, अलीकडील संघर्षानंतर इराणच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालात या दाव्यांशी पूर्णपणे असहमती दर्शवण्यात आली आहे. पेंटागॉनच्या गुप्तचर मूल्यमापनातून समोर आले आहे की, इराण अजूनही एक प्रभावी प्रादेशिक शक्ती म्हणून कायम आहे. त्यामुळे त्यांची वायुसेना नष्ट झाली आणि नौदल उद्ध्वस्त झाले, या दाव्यांवर संशय निर्माण झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, इराणची लष्करी ताकद अजूनही पश्चिम आशियात महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली स्थान टिकवून आहे. त्यांच्या लष्करी संरचनेला पूर्णपणे कमकुवत करण्यात यश आलेले नाही.
या अंतर्गत गुप्तचर मूल्यमापनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे. नियोजित लष्करी कारवाई पुढे ढकलण्यासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाकडून थेट विनंती करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मागील मुदत संपण्याच्या काही तास आधी ही घोषणा सार्वजनिक करण्यात आली. मात्र, तेहरानकडून या घोषणेचा तात्काळ विरोध करण्यात आला. इराणच्या संसदेचे अध्यक्ष यांच्या सल्लागार महदी मोहम्मदी यांनी अमेरिकेच्या या पावलाला फेटाळून लावत, पराभूत पक्ष अटी ठरवू शकत नाही, असे म्हटले. त्यांनी हा युद्धविराम विस्तार इराणी सरकारसाठी कोणतेही महत्त्व ठेवत नसल्याचे सांगत अमेरिकन सैन्याविरोधात लष्करी कारवाई वाढवण्याचे आवाहन केले.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये मोहम्मदी यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी जाहीर केलेला युद्धविराम विस्तार निरर्थक आहे, कारण पराभूत पक्ष अटी ठरवू शकत नाही. तसेच, नाकेबंदी कायम ठेवणे हे बॉम्बहल्ल्यांपेक्षा वेगळे नसून त्याला लष्करी उत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये इस्लामाबाद येथे २१ तास चाललेल्या चर्चेनंतर दीर्घकालीन करार करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode