
छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल (हिं.स.)। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद सय्यद आदिल हुसेन सय्यद यांच्या कुटुंबियांना स्वतःचे हक्काचे घर प्राप्त झाले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. हा क्षण केवळ आनंदाचा नाही, तर माणुसकीचा विजय साजरा करणारा आहे.
पहलगाम येथे झालेल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या वेदनादायी घटनेनंतर या कुटुंबांना पुन्हा उभं करण्याचा जो संकल्प करण्यात आला होता, तो आज पूर्णत्वाला गेला आहे.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून उभं राहिलेलं ‘आनंद नाथ सदन’ पहलगाम, काश्मीर येथे साकार झालं. या घरांच्या चाव्या आज संबंधित कुटुंबांच्या हातात देण्यात आल्या, तसेच घरातील सर्व आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
या प्रसंगी राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. तसेच या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले.
आज आम्ही सर्व शिवसेना टीमसह या भावनिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. ही केवळ घरांची उभारणी नाही, तर ती आहे आशा, विश्वास आणि नव्या आयुष्याची सुरुवात. “दुःखाच्या राखेतून उभा राहणारा आनंद — हाच खरा मानवतेचा विजय असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis