
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, तपासाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका लॉजमध्ये संबंधित तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून काही संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप आरोपींची स्पष्ट ओळख किंवा ठोस कारवाईबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध चर्चा रंगत असून, “कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?” असा संशय काही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिकांनी या प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि जलद तपास करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, तपास पूर्ण होईपर्यंत संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)