
जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.)| शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 39 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील महाबळ रोडवरील नागेश्वर कॉलनीतील रहिवासी समीर नटवरलाल शहा (वय 62) यांच्याशी 16 मे 2025 ते 3 मार्च 2026 या कालावधीत काही संशयितांनी संपर्क साधला. काहिरा मेहता, हेमंत मेहता तसेच सीईपीटी कस्टमर सर्विसचे प्रतिनिधी असल्याचे भासवत त्यांनी यूकेस्थित कंपनीचे मॅनेजर असल्याचा दावा केला. संशयितांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत शहा यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांनी भरलेल्या रकमेवर 10 हजार रुपयांचा नफा परत देऊन विश्वास अधिक दृढ केला. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडत एकूण 39 लाख रुपये उकळले.
मात्र, पुढे कोणताही नफा किंवा रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शहा यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 20 एप्रिल 2026 रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत. दरम्यान, ऑनलाईन गुंतवणूक करताना नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर