सॅफ महिला चॅम्पियनशिपमध्ये यजमान भारत, बांगलादेश आणि मालदीवसह गट 'ब' मध्ये
ढाका, २२ एप्रिल (हिं.स.) सॅफ महिला चॅम्पियनशिपमध्ये यजमान भारताला बांगलादेश आणि मालदीवसोबत गट ''ब'' मध्ये स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ मे ते ६ जून दरम्यान गोव्यातील मडगाव येथे होणार असून, सर्व सामने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले ज
भारतीय महिला फुटबॉल संघ


ढाका, २२ एप्रिल (हिं.स.) सॅफ महिला चॅम्पियनशिपमध्ये यजमान भारताला बांगलादेश आणि मालदीवसोबत गट 'ब' मध्ये स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ मे ते ६ जून दरम्यान गोव्यातील मडगाव येथे होणार असून, सर्व सामने पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील. नेपाळ, श्रीलंका आणि भूतान यांना गट 'अ' मध्ये, तर भारत, बांगलादेश आणि मालदीव यांना गट 'ब' मध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

या स्पर्धेसाठीचे मानांकन २१ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या फिफा महिला जागतिक क्रमवारीवर आधारित होते, ज्यात भारत (६९) आणि नेपाळ (८७) यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. बांगलादेश (११२) आणि श्रीलंका (१६२) यांना दुसऱ्या गटात, तर भूतान (१६४) आणि मालदीव (१६७) यांना तिसऱ्या गटात स्थान देण्यात आले.

भारत हा या स्पर्धेत सर्वात यशस्वी देश असून, त्याने २०१०, २०१२, २०१४, २०१६ आणि २०१९ मध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण बांगलादेशने मागील दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकून आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे.

भारत दुसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी, भारतीय संघाने २०१६ मध्ये सिलीगुडी येथे आयोजित स्पर्धा जिंकली होती. गोवा दुसऱ्यांदा सॅफ (SAFF) स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी, १९९९ मध्ये येथे पुरुषांची सॅफ चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती, ज्यात भारताने बांगलादेशला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande